या संकेतस्थळावर श्री ह.भ.प. महंत पुरुषोत्तम महाराज, श्री ह.भ.प.अंगद महाराज ढाळेगावकर , श्रीकृष्णा भैय्या ढाळेगावकर, श्री ह.भ.प. सोमेश्वर महाराज ढाळेगावकर आणि श्री ह. भ. प. शंकरभाऊ लोंढे सोनमांजरीकर यांचा आपणांस सप्रेम राम कृष्ण हरी !

Monday, July 18, 2016

श्री ह.भ.प. महंत पुरूषोत्तम महाराज गिरी विरचित श्री गजानन महाराज नित्यपाठ

Download e-book   in pdf.



श्री ह.भ.प. महंत पुरूषोत्तम महाराज गिरी विरचित


॥ श्री संत गजानन महाराज नित्यपाठ ॥



१)


नाम नित्य वाचे उच्चारी । गर्जतां वैखरी तयाचीया ॥१॥ 

नाम गणी गणातबोते । होय रितें काम क्रोधा ॥२॥ 

शांती क्षमा जया अंगीं । नामें रंगीं सर्वकाळ ॥३॥

सदा नामाचा लागे चाळा । प्रेम जिव्हाळा मुखामाजीं ॥४॥

उत्तमदास म्हणे नाम तारु । उतरी पैल पारु भवनदीचा ॥५॥


२)


तोरा सज्जन गडाहुनी । आले शेगावी चक्रपाणी ॥१॥

नग्न वेषे दिगंबर । तनु दिसे पै सुंदर ॥२॥

नाही कोणी ओळखिला । सुधिने तो पिडीला ॥३॥

देखोनि उच्छीष्ट पात्रावळी । अन्न खाय तो वनमाळी ॥४॥

बंकटाने देखियेले । प्रेमाने पाझर फुटले ॥५॥

विप्रा घरी तो गेला । वर्तमान सांगे तयाला ॥६॥

उत्तमदास म्हणे राणा । वदविल्या जीवन खुणा ॥७॥


३)


विप्र प्रेमे द्रवले । ताट घेवोनि ते आले ॥१॥

जेविले गजानन । तृप्त झाले त्रिभुवन ॥२॥

नेले बंकट सदना । बैसविले गुरु राणा ॥३॥

अंगी लावियले उटणे । चोळिले तया अंगत्राणे ॥४॥

उत्तमदास म्हणे भला । सद्भावे पुजियेला ॥५॥


४)


आजी माझें सुकृत फळले । म्हणोनि भेटलें नारायण ॥१॥

पुजा केली वासरमनी । माळा समर्पोनि पुष्पहार ॥२॥

साष्टांग करी दंडवत । ब्राह्मणाचा सद्गदीत कंठ होय ॥३॥

उत्तमदास म्हणे भावे । मज हेचि द्यावे जन्मी ॥४॥



५)


मारोती मंदीरीं होता उत्सव । आले गुरूदेव शेगांवी ॥१॥ 

अंगी शांती अचंबित । घटना अद्भूत तै स्थळी ॥२॥

तेथे ऊसाने मारियेले । दुष्ट श्रमले दोघे जण ॥३॥ 

खंडोजी धावोनि आलें । मर्दन केले शरीराचे ॥४॥ 

गण्या गण्या म्हणे वाणी । प्रेम तत्क्षणी तया अंगी ॥५॥ 

उत्तमदास म्हणे भला । करी सेवा आवलियाची ॥६॥ 


६)


कृष्णाजीच्या संगे चाले । तपस्वी मळ्यासी आलें ॥१॥ 

मंचकी बैसे गजानन । मंत्र जपे तो गणीगण ॥२॥ 

पेटला पलंग तो सत्वर । देखियेले नारी नर ॥३॥ 

अग्नी  न जाळी सज्जन । मध्ये बैसले गजानन ॥४॥ 

ब्रह्मगिरीसी पाचारीले । तया उपदेश केले ॥५॥ 

उत्तमदास म्हणे स्वलीला । आत्मरंगी तो रंगला ॥६॥


७)


विरक्त साधु गजानन । नाम स्मरण दिन निशी ॥१॥ 

रूप दिसे पिशाच्चपणे । मुखी चिंतने सर्वकाळ ॥२॥ 

लोभ आशा नये मना । शांती क्षमा जाणा तया अंगी ॥३॥ 

उत्तमदास म्हणे संत । पुरवी मनोरथ सर्वत्रांचे ॥४॥



८)


खंडुजी म्हणे त्याला । पुत्र देरे साधु मला  ॥१॥ 

नाहीं कांही संतान । कृपा करी दयाघन ॥२॥ 

संत प्रेमे पाझरले । प्रसाद त्यासी दिधले ॥३॥ 

खंडुजी झाले हर्षवाणी । बाळ जन्मे तत्क्षणी ॥४॥ 

भिकोजी नांव  ठेविले । नगरीसी भोजन दिले  ॥५॥ 

उत्तमदास म्हणे घरीं । मुक्त मोत्याच्या झालरी ॥६॥


९)


गेलें माणिक चौका । मिळविले धेनु देखा ॥१॥ 

वच्छ लागलें तया चरणीं । धेनु चाटी चक्रपाणी ॥२॥ 

शक्ती बळे दिगंबर । मिळविला गाईंचा संभार ॥३॥ 

बंकटाने देखियेले । हाती धरुनि घरीं नेले ॥४॥ 

उत्तमदास म्हणे जेंव्हा । भोजनी उठोनि गेलें तेंव्हा ॥५॥ 


१०)


पक्वान्न तयार केलें । गजाननासी आणियेले ॥१॥ 

भोजनी बैसे दिगंबर । तृप्त झाले जगदीश्वर ॥२॥ 

गजानन गेलें मळ्यासी । संगे बहुत जनरासीं ॥३॥ 

बैसले ते वृक्ष स्थळी । नाम जये सर्व काळी ॥४॥ 

आग्या महुळ उठले । जन तीव्र गतीने पळाले ॥५॥ 

उत्तमदास म्हणे प्रसंगी । चावा घेताति सर्व अंगी ॥६॥ 


११)


सर्वांगी मक्या झाल्या । देखियेल्या अंगत्राणे ॥१॥ 

हेही लीला गजानन । करी आपण सर्वभावे ॥२॥ 

अती तळमळे बंकट । धावे निळकंठ समयासी ॥३॥ 

तीव्र वेगे तो धावला । बंकट आला गुरुपासी ॥४॥ 

उत्तमदास म्हणे भाव । पाहे गुरुदेव अंतरीचा ॥५॥


१२)


आले अक्कलकोटी । नरसिंगाचिया भेटी ॥१॥ 

अंगी तया चढे वारूळ । निघे ध्वनी आंत सकळ ॥२॥ 

ऐसा भक्तीचा पुतळा । नाम जपे  वेळोवेळा ॥३॥ 

नरसिंगाने देखिले डोळा । दिव्य रुपे तो सोज्वळा ॥४॥ 

घातिले साष्टांग दंडवत । धावोनि आले गुरुनाथ ॥५॥ 

उत्तमदास म्हणे भले । योग मार्ग सांगितले ॥६॥ 


१३)


गजानन गेले चंद्रभागेतीरा । बैसविला वीरा वाळवंटी ॥१॥ 

दिव्यशक्तीचा अनुभव । दाविला तंव प्रत्यक्ष ॥२॥ 

सुर्यासमान तेज केले । दृष्टी देखिले उदयी ॥३॥ 

ब्रह्ममुहुर्ती आले स्नाना । वज्रभूषणा हारिखला ॥४॥ 

उत्तमदास म्हणे तत्क्षणी । अश्रु नयनी लोटले ॥५॥


१४)


दोन्ही कुळीचे भांडण ।वाद वाढला दारुण ॥१॥ 

सर्प मुंगसाचे पै वैर। व्याघ्र गाय न म्हणे थोर ॥२॥ 

देशमुख पेटले क्रोधानळी । वधावे खंडुजी तै काळी ॥३॥ 

शीघ्र अंधारी ते आले । गजाननाने कवटाळीले ॥४॥ 

खंडुजी संताच्या आधारे । चुकले मरण साचोकारे ॥५॥ 

उत्तमदास म्हणे सेवेचे फल । त्यावरी कृपेचे हे वोल ॥६॥ 

१५)


बंकटासी करुनि समाधान । सदना पाठविले जाण ॥१॥ 

नये नामासी विसरु । उध्दरेल भव पारु ॥२॥

मुखी नामाचा लागे चाळा । चरण वंदी यम काळा ॥३॥ 

उत्तमदास म्हणे नाम । प्राप्त होय निजधाम ॥४॥


१६)


गणिगण मंत्राचिया घोषे । होय हर्षे गजानन ॥१॥ 

नित्य नामस्मरणाचा छंद । तेणें परमानंद मागे पुढे ॥२॥

भय नाहीं कळीकाळाचे । चरण वंदी साचे यमदूत ॥३॥

उत्तमदास म्हणे तंव बळे । नमिती काळे ईहलोकीं ॥४॥


१७)


न दिसे तो दिगंबर । तयाविण शुन्य नगर ॥१॥

शोधू पाहे जेथें तेथें । सर्व दिशा ओस रितें ॥२॥ 

उदकाविण मासोळी । तैसा भास्कर तळमळी ॥३॥

त्या साधुचे लागे पिसे । कांही त्याविण न दिसें ॥४॥ 

उत्तमदास म्हणे त्या ध्यानीं । जागृती सुसुप्ती स्वप्नीं ॥५॥


१८)


नागपूर सर्व धुंडिले । बंकट पीतांबर श्रमले ॥१॥ 

बैसले जयें स्थळीं । गोचर दृष्टीने न्याहाळी ॥२॥ 

भास्कराने सुक्ष्मपणें । देखिलें वृक्षीं गुरूराणे ॥३॥ 

उत्तमदास म्हणे ठाया । प्रगटले देवराया ॥४॥


१९)


गजानन गेलें नागपुरा । भक्ती विरा बैसविले ॥१॥

त्यासी नाही ओळखिले । बाहेर काढिले दवडोनि ॥२॥ 

न हाले काही इंजिन । येती शरण साधुसी ॥३॥

उत्तमदास म्हणे तया । बैसे ठाया गजानन ॥४॥


२०)


इंजिन वेगाने धावले । ल्या मध्ये बैसले सत्पुरुष ॥१॥

मंत्र गण गण उच्चारी मनीं । आवड शुळपाणी दर्शनाची ॥२॥ 

नावेमध्ये बैसले सर्व । परीक्षा पाहें गुरुदेव ॥३॥

नावे आत छिद्र पडले । घाबरले त्या ठाया ॥४॥

नर्मदेने हात लाविले । दर्शन घडले संताचे ॥५॥

उत्तमदास म्हणे खरा । सर्वांसी दिधला थारा ॥६॥


२१)


क्रूर धेनुबाळापुरा । दृष्टीपात करी संत विरा ॥१॥ 

ऐसा शक्तीचा सागर । भक्ती बळे दिगंबर ॥२॥ 

केली कृपा पशूवरी । न राहे विषम अंतरी ॥३॥ 

उत्तमदास म्हणे खरा । तपस्वी संत विरा ॥४॥


२२)


काग बैसलें खावया । दुष्ट लागले त्या ठाया ॥१॥

दिधला पक्षियांसी थारा । रोखियेले दुर्जनावरा ॥२॥ 

पाजिले तयासीं जळा । गेले उठोनि ते प्रेमळ ॥३॥ 

उत्तमदास म्हणे सखा । समान बुद्धी समरेखा ॥४॥


२३)


बंकटासी करुनि समाधान । सदना पाठविले जाण ॥१॥ 

नये नामासी विसरु । तेणें उध्दरेल भवपारु ॥२॥

मुखीं प्रेम जिव्हाळा । सदा लागे नामचाळा ॥३॥ 

उत्तमदास म्हणे नाम । प्राप्त होय निजधाम ॥४॥


२४)


साधु गेले कवण्या ठाया । नेई देवराया तयापासी ॥१॥ 

आम्ही बाळे शक्ती हीन । नाही अवसान ते अंगी ॥२॥ 

त्याचे लागले मज पीसे । तळमळ होतसे मनामाजी ॥३॥ 

उत्तमदास म्हणे टकळां । पाहे वेळोवेळां वाट देवा ॥४॥


२५)


अश्वावरी कृपा छाया । केली गजानने सखया ॥१॥ 

चतुर्थ चरणांतळीं । शयन करी प्रांजळीं ॥२॥ 

ऐसा प्रतापी तो गहन । सकळ भक्तांचे भुषण ॥३॥ 

उत्तमदास म्हणे भला । तेणें देव राबविला ॥४॥


२६)


मज नेई बा पैलतीरा । दीन दयाळा गिरजावरा ॥१॥ 

अति तळमळ चित्तासी । फुटो पाहे हृदयासी ॥२॥ 

माता चुकलिया वनीं । बाळ हुरहुरा पाहे स्थानीं ॥३॥ 

उत्तमदास म्हणे घननिळा । दर्शन द्यावे बा दयाळा ॥४॥


२७)


पुण्यस्थळीं जयाचि समाधी । उद्धरी भवाब्धि दरुषणे ॥१॥ 

ऐसा तपस्वी तो जाण । होय उद्धरण जड जीवा ॥२॥ 

नित्य जयाचे स्मरण । चित्त समाधान सर्वकाळ ॥३॥ 

चतुराक्षरी जप प्रभाव । भेटले गुरुदेव गजानन ॥४॥ 

उत्तमदास म्हणे सत्य हे वाक्य । ब्रह्मास्मि निक्य होय जीव ॥५॥


२८)


अठराशे अष्टोत्तरे । माघ मासि साचोकारे ॥१॥ 

शेगांवीं आगमन । प्रगटले गजानन ॥२॥ 

दिव्य तेज झळके । मंत्र जपे ईहलोके ॥३॥ 

उत्तमदास म्हणे नयनीं । तेज न माये गगनीं ॥४॥


२९)


गणगण मंत्र सोपा । करी निष्पापा सकळांसी ॥१॥ 

नाम जपे सर्वकाळ । होय सोज्वळ जीवन ॥२॥ 

ध्यानीं मनीं जागृतीं । लिप्त सुसुप्ती अवस्था ॥३॥ 

उत्तमदास म्हणे ध्यास । पुढे दृष्टीस देव तया ॥४॥ 



संपादक- श्री ह.भ.प. सोमेश्वर महाराज ढाळेगांवकर