Download e-book (.pdf)
श्री ह.भ.प. महंत पुरूषोत्तम महाराज गिरी विरचित
॥ ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराज यांचे अभंगरूपी जीवन चरित्र ॥
१)
मोतीराम मोतीराम । उच्चारीतां जाय श्रम ॥१॥
करी नित्य नामस्मरण । जगाचे होये उद्धरण ॥२॥
दिन रजनी हाचि धंदा । सदा उच्चारी गोविंदा ॥३॥
उत्तमदास म्हणे हरुष । मूढ जन तरे भव दोषे ॥४॥
२)
मोतीराम वंश मारवाडी ।एकादशी वृत्ताची आवडी ॥१॥
मुखीं हरी नामाचा धंदा । सदा उच्चारी गोविंदा ॥२॥
वाचे हरीनामाचा चाळा । तेणें दवडीला यम काळा ॥३॥
उत्तमदास म्हणे भला । नित्य देव राबविला ॥४॥
३)
भक्त उदास सर्वभावे । प्रेम तया नित्य नवे ॥१॥
वाचेसी लागला चाळा । भजन करी वेळोवेळा ॥२॥
नाहीं देहाचे कांही भान । पायामध्ये आळ्या जाण ॥३॥
उत्तमदास म्हणे साधू विरक्त । सदा वसवि एकांत ॥४॥
४)
साधू भूतळीं अवतीर्ण । केले जगाचे उद्धरण ॥१॥
मुखीं हरीनामाचे चिंतन । तेणें तरेल मूढजन ॥२॥
ऐसा प्रतापी गहन । भक्तामाजि तो भुषण ॥३॥
उत्तमदास म्हणे संत भला । दोषियांचा उद्धार केला ॥४॥
५)
पायात आळ्या मुखीं चिंतन । करिता नामस्मरण सर्वभावे ॥१॥
दिन रजनी करी किर्तन । गाती पुराण पवाडे ॥२॥
देह परोपकारी झिजविला । हरीनामी रंगला सर्वकाळ ॥३॥
उत्तमदास म्हणे नित्य । बोले वाचा सत्य तरावया ॥४॥
६)
डोईवरी असे पगडी । अंगी घाली बारबंडी ॥१॥
मुखीं हरीनामाचा चाळा । दिन रजनी पै जिव्हाळा ॥२॥
देही असोनि विदेही । सुख दु:खादि भान नाही ॥३॥
उत्तमदास म्हणे संत । विरळा पाहे जगात ॥४॥
७)
सर्व त्याग अंतरी । गर्जतां वैखरी जयाचिया ॥१॥
न खंडेचि नामस्मरण । वाचे नामकिर्तन सर्वकाळ ॥२॥
आषाढी कार्तिकी पंढरपुरी । उभे भीमातीरीं वाळवंती ॥३॥
उत्तमदास म्हणे संत विरा । जीवन सारा परमार्थी ॥४॥
८)
षड्रिपूचा नाश झाला । ऐसा दादुला भुतळीं ॥१॥
मुखीं नामाचा प्रभाव । पुढे देव अखंडित ॥२॥
हिंडतसे मागे मागे । रक्षी पांडुरगे भक्तांसी ॥३॥
उत्तमदास म्हणे दिव्य दृष्टी । पाहे सृष्टी माझी तो ॥४॥
९)
ब्यान्नव वर्षांचे शरीर । काया झालीसे जर्जर ॥१॥
मुहुर्त पुसे ब्राह्मणांसी । श्रावण वद्य पंचमीसी ॥२॥
ऐसे सांगे विप्रवर । पुण्यपावन गोदातीर ॥३॥
लक्ष लागले ऊर्ध्वगती । ऐशा समयीं देह ठेविती ॥४॥
उत्तमदास म्हणे विरळा कोणी । लीन झालें ईश्वरचरणी ॥५॥
१०)
मुख्य समाधी फळा ग्रामासी । नेमिले स्थळ गोदातीरासी ॥१॥
दिन रजनी नामस्मरण । विणा वाजे रात्रंदिन ॥२॥
अन्नसत्राचा होय सडा । चढे भक्तिचा पूर गाढा ॥३॥
उत्तमदास म्हणे पुण्यभूमी । तरती तयाचिये नामीं ॥४॥
संपादक- श्री कृष्णा महाराज ढाळेगावकर
SAINT MOTIRAM MAHARAJ PHALA
These images are designed by Krishna Dhalegaonkar.
